ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक करण्यात येत असून, काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी भाजपा आणि एमआयएमवर फिक्सिंगचा आरोप केला आहे. ओवैसींनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडून उत्तर प्रदेश निवडणुकीत मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी 400 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. शहा आणि ओवैसी यांच्यात बिहार निवडणुकीदरम्यान गुप्त बैठक झाली होती. त्या प्रमाणेच उत्तर प्रदेश निवडणुकीत त्यांचं फिक्सिंग झाल्याचं दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.
भाजपला फायदा पोहोचावा या उद्देशानेच एमआयएम प्रत्येक निवडणुकीत उतरते. ओवैसी यांच्यावर मुसलमानांनी विश्वास न ठेवता काँग्रेसला मतदान केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही ओवैसींना लक्ष्य केलं होतं.असदुद्दीन ओवैसी हे भाजपाचे एजंट असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. तसेच ओवैसींना मुसलमानांच्या विकासाशी काहीच देणे-घेणे नाही. ते फक्त भाजपाकडून पैसे घेऊन मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करतात, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं होतं. मुसलमानांच्या हक्कावर बोलणा-या ओवैसींनी हैदराबादमध्ये मुसलमानांसाठी काय केले ते आधी सांगावं, असं ते म्हणाले आहेत.