400 कोटींचा घोटाळा?, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याबाबत सोनिया गांधींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 08:57 PM2021-08-27T20:57:05+5:302021-08-27T20:57:43+5:30

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणी गुरुवारी जाहीर झाली. त्यामध्ये, सुनील केदार यांच्यावर कुरघोडी करणारे माजी आमदार आशिष देशमुख यांना महासचिवपद देण्यात आलं आहे.

400 crore scam ?, Ashish deshmukh letter to Sonia Gandhi regarding expulsion from the cabinet of sunil kedar | 400 कोटींचा घोटाळा?, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याबाबत सोनिया गांधींना पत्र

400 कोटींचा घोटाळा?, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याबाबत सोनिया गांधींना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देक्रीडामंत्री सुनील केदार व माजी आमदार आशिष देशमुख यांच्यातील परंपरागत राजकीय युद्धाला गेल्या काही वर्षांत विराम लागला होता. मात्र, एका खुर्चीवरून पुन्हा एकदा या संघर्षात ठिणगी पडली आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि क्रीडामंत्री सुनील केदार आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पक्षाने नव्यानेच नियुक्त केलेल्या महासचिवांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून मंत्री सुनील केदार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या पक्षांतर्गत राजकीय भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. 

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर प्रदेश काँग्रेसची विस्तारित कार्यकारिणी गुरुवारी जाहीर झाली. त्यामध्ये, सुनील केदार यांच्यावर कुरघोडी करणारे माजी आमदार आशिष देशमुख यांना महासचिवपद देण्यात आलं आहे. आपल्या निवडीनंतर दुसऱ्याचदिवशी देशमुख यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. त्यामध्ये, पक्षप्रमुख सोनिया गांधींकडे सुनील केदार यांना मंत्रीपदावरुन हटविण्याची मागणी केली आहे.  ४०० कोटी रूपयांचा घोटाळा दडपण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप देशमुख यांनी केदार यांच्यावर ठेवला आहे. 

क्रीडामंत्री सुनील केदार व माजी आमदार आशिष देशमुख यांच्यातील परंपरागत राजकीय युद्धाला गेल्या काही वर्षांत विराम लागला होता. मात्र, एका खुर्चीवरून पुन्हा एकदा या संघर्षात ठिणगी पडली आहे. काटोलच्या आढावा बैठकीत शेजारच्या खुर्चीत बसलेल्या देशमुखांना केदारांनी सर्वांसमक्ष उठवले. खुर्चीसाठी झालेल्या अपमानातून देशमुख रुसले आणि दुसऱ्याच दिवशी घोटाळेबाज केदारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी करणारा लेटरबॉम्ब त्यांनी टाकला. खुर्चीच्या या किस्स्याची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा रंगली आहे. त्यानंतर, केदार हे दिल्ली दरबारीही जाऊन आले. मात्र, त्यांच्या दिल्लीवारीनंतर देशमुख यांना प्रमोशनच मिळाले. त्यामुळे केदार यांची दिल्लीवारी निष्फळ ठरल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच, आशिष देशमुख यांनी आता थेट सोनिया गांधींनाच पत्र लिहून केदार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. 

आशिष देशमुख कशामुळे नाराज झाले 

आशिष देशमुख यांनी गेल्या काही दिवसांपासून आपला मोर्चा पुन्हा एकदा काटोल मतदारसंघाकडे वळविला आहे. शनिवार, २१ जुलै रोजी पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी काटोल व नरखेड येथे विविध विकासकामांच्या आढावा बैठका घेतल्या. या बैठकांना जिल्हा परिषदेचे पदाधकारी, अधिकारी, स्थानिक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सरपंच यांना निमंत्रित करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता काटोल तहसील कार्यालयात आयोजित बैठकीसाठी केदार यांच्यापाठोपाठ आशिष देशमुख पोहचले व मंचावर केदार यांच्या बाजूच्या खुर्चीत बसले. ती खुर्ची जि.प. अध्यक्षांसाठी राखीव होती. याशिवाय दोन खुर्च्या जि.प. सभापतींसाठी राखीव होत्या.

केदार यांनी देशमुख यांना लगेच टोकले. ही जिल्हा परिषद व सरपंचांची आढावा सभा आहे. त्यामुळे येथे संबंधित पदाधिकारी बसतील, असे सांगितले. हे ऐकूण देशमुख खुर्चीवरून उठले व शेवटून दुसऱ्या खुर्चीत जाऊन बसले. पुढे त्यांना बैठकीत बोलण्याचीही संधी मिळाली नाही. सरपंचांसमोर आपला अपमान झाला हे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट जाणवत होते. बैठकीतही याची कुजबुज सुरू झाली होती. शेवटी तासभर बसून देशमुख निघून गेले. यानंतर दुपारी ३.३० वाजता देशमुख नरखेडच्या बैठकीत पोहचले. येथे मात्र ते मंचावर न जाता समोर सरपंचांमध्ये जाऊन बसले. येथेही त्यांना मंचावर खुर्ची मिळाली नाही. या घटनाक्रमामुळे देशमुख कमालीचे दुखावले.

Web Title: 400 crore scam ?, Ashish deshmukh letter to Sonia Gandhi regarding expulsion from the cabinet of sunil kedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.