ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. २७ - काही कंपन्या दिवाळी बोनसमध्ये आपल्या कर्मचा-यांना महिन्याचा संपूर्ण पगार किंवा सोन्या-चांदीच्या महागडया वस्तू देतात. पण एखादी कंपनी घर, गाडी बोनसमध्ये देत असेल तर.. त्या कंपनीच्या कर्मचा-यांचे नशीब फळफळले असेच म्हणावे लागेल.
सूरत स्थित हिरे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचा-यांना यंदाच्या दिवाळी बोनसमध्ये चक्क ४०० फ्लॅट आणि १२६० गाडयांची भेट दिली आहे. सावजी ढोलकीया यांच्या हरे क्रिष्णा एक्सपोर्ट कंपनीने यंदाच्या दिवाळीमध्ये बोनसवर ५१ कोटी रुपये खर्च केले आहेत.
कंपनीचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मंगळवारी कंपनी कर्मचा-यांच्या अनौपचारीक सभेमध्ये या घसघशीत बोनसची घोषणा करण्यात आली. २०११ पासून बोनस अशा प्रकारे जाहीर करण्याची परंपरा चालू आहे. मागच्यावर्षी ढोलकीया यांनी दिवाळी बोनसमध्ये कर्मचा-यांना ४९१ गाडया आणि २०० फ्लॅट दिले होते.
ढोलकीया अमरेली जिल्ह्यातील दुधाला गावचे. काकांकडून कर्ज घेऊन त्यांनी हिरे व्यापार सुरु केला. ढोलकीया यांनी एकारात्रीत हे यश मिळालेले नाही. प्रचंड मेहनत करुन ते इथपर्यंत पोहोचले. आपल्याला मुलाला द्रव्यला पैशांची किंमत कळावी म्हणून त्याला साधी नोकरी करायला लावली. त्यांनी फक्त तीन जोडी कपडे आणि आपातकालीन वेळेसाठी ७ हजार रुपये देऊन मुलाला कोचीला पाठवले.