नवी दिल्ली : भारतातील ७८० भाषांपैकी ४०० येत्या ५० वर्षांत नामशेष होण्याची शक्यता आहे, असे ज्येष्ठ भाषाअभ्यासक गणेश एन. देवी यांनी म्हटले.इंग्रजी भाषेमुळे भारतातील हिंदी, मराठी, बांगला आणि तेलगू या मुख्य भाषांना धोका नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे आॅफ इंडियाच्या (पीएसएआय) ११ खंडांच्या गुरुवारी येथे झालेल्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. जगातील ही सर्वात मोठी भाषेची पाहणी असल्याचे सांगितले जाते. जगातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा येत्या ५० वर्षांत नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. या चार हजार भाषांपैकी ४०० भारतातील आहेत. याचा अर्थ असा की, धोक्यात असलेल्या दहा टक्के भाषा या भारतात आहेत, असे गणेश देवी म्हणाले. इंग्रजीचे प्रभुत्व हिंदी, बांगला, मराठी, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती व पंजाबी या मोठ्या भाषांना नष्ट करून टाकेल, हा समज निराधार आहे, कारण जगातील पहिल्या तीस भाषांमध्ये त्या आहेत. त्या किमान एक हजार वर्षे जुन्या असून, त्या बोलणारे दोन कोटींपेक्षा अधिक आहेत. चित्रपटसृष्टी, उत्तम संगीत परंपरा, शिक्षणाची उपलब्धता व जोमाने वाढणाºया प्रसारमाध्यमांचा त्यांना आधार आहे, असे देवी म्हणाले.भाषा गमावणे म्हणजे मोठ्या संख्येतील मानवी भांडवल, सांस्कृतिक भांडवल आणि आर्थिक भांडवल गमावण्यासारखे आहे. कारण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भाषेचा कल्पकतेने उपयोग केला तर ती आर्थिकदृष्ट्या उत्पादक बनू शकते, असे देवी यांनी म्हटले. देवी म्हणाले की, देशातील किनारी भागातील भाषा या जास्त धोक्यात आहेत. त्याचे कारण म्हणजे त्या भागात उदरनिर्वाहाचे साधन सुरक्षित राहिलेले नाही. मात्र काही आदिवासी भाषांची चांगली वाढही झाली आहे. त्या भाषेतील सुशिक्षित आपल्या भाषेत लिहू लागल्याचा हा परिणाम आहे.
भारतातील तब्बल ४०० भाषा नष्ट होण्याची भीती; इंग्रजीचा धोका मात्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:46 AM