ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - जगभरात भारतातील रस्ते अतिशय धोकादायक मानले जातात. २०१५ साली यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. इतर वर्षांच्या तुलनेत २०१५ सालात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रमाणात ५ टक्के वाढ झाली असून हा आकडा १.४६ लाखांवर पोचला आहे. गेल्या वर्षी रस्ते अपघातात दररोज सुमारे ४०० नागरिकांनी जाव गमावल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, दर साडेतीन मिनिटांनी एक नागरिक अपघातात मृत्यूमुखी पडतो.
हा आकडा म्हणजे सरकारसाठी धोक्याचा इशारा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०२० पर्यंत रस्ते अपघातात जीव गमवाव्या लागणा-यांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते.
विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातामुळे जीव गमवाव्या लागणा-यांची संख्या सर्वाधिक (१७,६६६) आहे, त्यामागोमाग तामिळनाडूचा (१५,६४२) नंबर लागतो. या यादीत महाराष्ट्र तिस-या (१३,२१२) क्रमांकावर असून राजस्थानमध्ये मृतांचा आकडा १०,५१० इतका असल्याचे समजते.
दरम्यान मोठ्या राज्यातींल मृतांचा आकडा वाढत असतानाच, १० छोट्या राज्यांसह दिल्ली, चंदीगडसहित केंद्रशासित प्रदेशांमधील मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. आसाममध्ये हे प्रमाण सर्वात कमी आहे.