नवी दिल्ली : चीनने आपल्या भारतविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या असून, लडाखजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपाशी आपले तब्बल ४० हजार सैनिक आणून ठेवले आहेत. मात्र भारतीय लष्कर व हवाई दलही तिथे सज्ज आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला आणि जवानांच्या तयारीचे कौतुक केले.
चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर भारताकडून आणखी सैन्यमाघारी करण्यात येणार नाही. भारतीय लष्कर दीर्घ पल्ल्याच्या रणनीतीची तयारी करीत आहे. एवढेच नव्हे, तर भारत आणखी काही लष्कर विशिष्ट जागी तैनात करण्याच्याही तयारीत आहे, असे समजते.
१४ जुलैला कमांडरांच्या चौथ्या टप्प्याच्या चर्चेनंतर चारपैकी दोन ठिकाणांवरील संपूर्ण सैन्य माघारीनंतर पुढील चर्चेबाबत अनिश्चितता आहे. गलवान खोऱ्यात पॅट्रोलिंग पॉइंट १४ पासून (पीपी१४) दोन्ही सैन्यांनी माघार घेतलेली आहे, तसेच पीपी१५ वरून चीनच्या सैनिकांनीही एलएसीवरून सैन्यमाघारी घेतली आहे. तरीही सध्या तेथे दोन्ही बाजूंचे ५० सैनिक एकमेकांपासून १ किलोमीटर अंतरावर आहेत. भारत आणि चीनदरम्यान पेंगाँग त्सो या वादग्रस्त ठरलेल्या फिंगर ५ वरून चीनने माघार घेतली आहे.
हिवाळ्यात असते मोठे आव्हान
च्हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करण्याबाबत सूत्रांनी सांगितले की, आजपर्यंतच्या अनुभवानुसार या काळात येथे सैन्य तैनातीची गरज असते. त्यामुळे तेथे साठा करणे गरजेचे असते. च्परिवहन, पुरवठा व सैन्य साहित्याच्या बाबतीतही ही व्यवस्था गरजेची आहे. आम्ही यावर तोडगा शोधत आहोत; पण हे मोठे आव्हान आहे.