नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेतील भाषणाचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, राहुल गांधींनी मनरेगा या योजनेसाठी केंद्र सरकारने दिलेल्या ४० हजार कोटी पॅकेजचा उल्लेख करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तसेच, मनरेगाच्या दूरदर्शीपणाला समजण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो, असेही राहुल यांनी म्हटले आहे.
देशात कोरोना महामारीमुळे तब्बल ५५ दिवसांचे लॉकडाऊ पार पडले असून ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन राहणारच आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील आर्थिक परिस्थितीचा विचार करुन, नागरिकांच्या जीवनशैलीला गतीमान करण्यासाठी पतंप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. देशाच्या जीडीपीच्या १० टक्के एवढ मोठं पॅकेज सरकारकडून जाहीर करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या या पॅकेजची विस्तृत माहिती,अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ५ टप्प्यांमध्ये दिली. त्याच, काँग्रेस सरकारने सुरु केलेल्या मनरेगा या योजनेसाठी तब्बल ४० हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी याच पॅकेजच्या आधारे मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेतील एका भाषणात, मनरेगा योजनेबद्दल बोलताना, ही योजना म्हणजे काँग्रेसच्या अपयशाचं मोठं उदाहरण असल्याचं म्हटलं होतं गेल्या ६० वर्षात काँग्रेसने न केलेल्या कामांचं फळ म्हणजे मनरेगा आहे. मी, या योजनेचा मोठा गाजावाजा करणार, असेही मोदी म्हणाले होते. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तोच व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, मनरेगाच्या दूरदृष्टीला समजून घेण्यासाठी आणि प्रत्साहन देण्यासाठी आम्ही आपले आभार मानतो, असेही राहुल यांनी म्हटले आहे.