नवी दिल्ली : भारताने कॅनडाला आपल्या ४१ मुत्सद्दींना परत बोलावण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, या राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आल्याचा दावा वृत्तात केला आहे.
वृत्तानुसार, या ४१ मुत्सद्दींपैकी जे अंतिम मुदतीनंतर भारतात राहतील, त्यांची सूट आणि इतर फायदे थांबवले जातील. त्यांचे राजनैतिक संरक्षण काढून घेतले जाईल. देशात कॅनडाचे सुमारे ६२ मुत्सद्दी कार्यरत आहेत. व्हिएन्ना करारांतर्गत परदेशातील मुत्सद्दींवर कोणताही खटला चालवता येत नाही आणि त्यांना अटकही करता येत नाही. तथापि, एखाद्या मुत्सद्दीने गुन्हा केल्यास त्याला त्याच्या मायदेशी परत पाठवत तेथे कारवाई केली जाते.
कॅनडाला सहकार्य करा...
हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूच्या तपासात कॅनडाला सहकार्य करण्याचे आवाहन अमेरिकेने भारताला केले आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले आहे.