श्रीनगर : दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक युवकांचे भरती होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येत दहशवादी बनण्यास जात असलेल्या स्थानिक युककांनी मुख्य प्रवाहात आणले आहे. 2018 मध्ये 272 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच, मोठ्या संख्येत दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जीओसी 15 कॉर्पचे के.जे.एस धिल्लॉन यांनी सांगितले की," दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेली मोहीम कायम राहील. दहशतवाद वाढू देणार नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 41 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात 25 जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सहभागी होते. तर 13 दहशतवादी पाकिस्तानी होते." याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे नेटवर्क पूर्णपणे नेस्तनाभूत केले आहे. त्यामुळे आता येथील परिस्थिती बदलली असून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी संघटनांचे नेतृत्व करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, असेही के.जे.एस धिल्लॉन यांनी सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद वकार याला दोन दिवसांपूर्वी मीरगुंड परिसरातून अटक करण्यात आली होती. मोहम्मद वकार पाकिस्तानमधील मियां, मियांवाली पंजाब प्रांतात राहात होता. तसेच, 2017 पासून उत्तर काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सक्रीय होता.