आसाम सरकारने बालविवाहाविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. यासंदर्भात बोलताना, राज्यात बालविवाहाविरोधातील कारवाईच्या तिसऱ्या टप्प्यात 416 जणांना अटक करण्यात आली आहे. 21-22 डिसेंबरच्या रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली होती, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी रविवारी दिली. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी 335 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांना रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बाल विवाहविरोधात आसाम सरकार स्ट्रिक्ट -आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. सरमा म्हणाले, "ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठी आम्ही यापुढेही धाडसी पावले उचलत राहू. राज्य सरकारने 2023 मध्ये फेब्रुवारी आणि ऑक्टोबर या दोन टप्प्यांत बालविवाहविरोधी मोहीम सुरू केली होती. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात 4,515 गुन्हे दाखल करून 3,483 जणांना अटक करण्यात आली होती. तर ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या टप्प्यात 710 गुन्हे दाखल करून 915 जणांना अटक करण्यात आली होती.
बाल विवाहाचे प्रमाण कमी झाले - आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या (17 जुलै) दिवशी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हणण्यात आले आहे की, बालविवाह प्रकरणांमध्ये कायदेशीर हस्तक्षेप करण्यावर आसाम सरकारने दिलेला भर, आता उर्वरित देशासाठी आदर्श बनला आहे. आसाम सरकारच्या या कायदेशीर धोरणामुळे 2021-22 आणि 2023-224 या वर्षांत राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये बालविवाहात 81 टक्क्यांनी घट झाली आहे.
आपण जिवंत आहोत, तोवर... -याच वर्षाच्या सुरुवातीला हिमंता बिस्वा सरमा यांच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, 1935 रद्द केला. यावरून आसाम विधानसभेत मोठा गदारोळही झाला होता. तेव्हा, याची गरज काय, असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता? यावर, मुख्यमंत्री हिमंता संतप्तपणे म्हणाले होते की, आपण बालविवाहावर बंदी घालणारच. एवढेच नाही, तर आपण जिवंत आहोत, तोवर आसाममध्ये बालविवाह होऊ देणार नाही, असेही सरमा यांनी म्हटले होते.