नवी दिल्ली : दिल्लीत परवडणारी ई-वाहन चार्जिंग स्टेशन सुरू झाली आहेत. मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आणखी 42 ईव्ही चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले. याठिकाणी 140 चार्जिंग पॉइंट्स असतील. दिल्ली सरकारने गेल्या वर्षी पीपीपी मोडवर 100 चार्जिंग स्टेशन उघडण्याची घोषणा केली होती.
यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "आज दिल्लीला 42 नवीन ईव्ही चार्जिंग स्टेशन मिळाले आहेत. त्यानंतर आता एकूण 53 ईव्ही चार्जिंग स्टेशन आहेत. गेल्या आठ वर्षांत प्रदूषणात मोठी घट झाली आहे. 2014 मध्ये पीएम 10 आणि पीएम 2.5 प्रदूषणाची पातळी 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे फळ दिसून येत आहे."
याचबरोबर,"2020 मध्ये आम्ही देशातील पहिली ईव्ही पॉलिसी बनवली. आमचे लक्ष्य 25 टक्के ईव्ही वाहने खरेदी करण्याचे होते. आज 13 टक्के ईव्ही वाहने दिल्लीत खरेदी केली जात आहेत. नीती आयोगाने म्हटले की, दिल्लीचे ईव्ही धोरण सर्वोत्कृष्ट असून इतर राज्यांनीही ते शिकले पाहिजे", असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, शहराच्या प्रत्येक भागात कार्यक्षम आणि सुलभ ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे दिल्ली सरकारचे उद्दिष्ट आहे. जिथे प्रति युनिट चार्जिंगची किंमत केवळ देशातच नाही तर जगात सर्वात कमी असेल आणि लोकांना ईव्ही चार्जिंगसाठी प्रति युनिट तीन रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागेल.
डिसेंबरमध्ये राजधानीत विकल्या गेलेल्या एकूण वाहनांपैकी 16.7 टक्के ई-वाहनांचा वाटा होता, जो देशातील सर्वाधिक आहे. तसेच, सर्व चार्जिंग स्टेशन सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर आधारित आहेत.