देशभरात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत असून अवघी अयोध्या नगरी दुमदुमली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तीभावात आणि विधीवत पुजेने संपन्न झाला. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जगभरातील रामभक्तांना या सोहळ्याचा याची देही, याची डोळा अनुभव घेत आनंद व्यक्त केला. ५०० वर्षांच्या संघर्षाची स्वप्नपूर्ती या भव्यदिव्य मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याने झाली. या सोहळ्याला निमंत्रण देऊनही अनेकांनी याकडे पाठ फिरवली. तर, काहींनी राम मंदिर बांधल्याने मूळ प्रश्न संपणार आहेत का, अशी टीकाही केली. एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीने ओवेसी यांनी वेळ साधत देशातील बेरोजगार तरुणांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
देशभरात राम मंदिराचा उत्साह असून गावागावात, गल्लोगल्ली सोहळा साजरा होत आहे. काही जणांनी या सोहळ्याचं राजकारण केलं जात असल्याची टीका भाजपा आणि आरएसएसवर केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या सोहळ्याच्या माध्यमातून आगामी लोकसभेची पायाभरणी केल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. तर, राम मंदिराचा प्रश्न सुटल्याने देशातील इतर प्रश्नांचे काय, महागाई कमी होणार आहे का, बेरोजगारांना नोकऱ्या मिळणार आहेत का?, असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वेळ साधत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर केली आहे. ज्यामध्ये, देशात सध्या ४२.३ टक्के पदवीधर बेरोजगार असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. विशेष, म्हणजे तो अहवाल गतवर्षीचा असून ती बातमीही सप्टेंबर २०२३ मधील आहे.
ओवेसी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधूनच देशातील तरुणांच्या बेराजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या ट्विटरवरील आजच्या प्रसारणावरुन दिसून येतं.
दरम्यान, अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, देशातील २५ वर्षांखालील तरुण पदवीधरांपैकी ४२.३ टक्के बेरोजगार आहेत. देशातील बेरोजगारीचा दर (Unemployment Rate) २०१९-२० मध्ये ८.८ टक्के होता, जो २०२०-२१ मध्ये ७.५ टक्के आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६.६ टक्क्यांवर आला आहे. अहवालानुसार, देशातील सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे, अशा आशयाची ही बातमी आहे.