आंबेडकर स्मारकासाठी ४२५ कोटींचा प्रस्ताव-
By admin | Published: August 25, 2015 10:46 PM
आंबेडकरांच्या स्मारकारसाठी ४२५ कोटींचा प्रस्ताव
आंबेडकरांच्या स्मारकारसाठी ४२५ कोटींचा प्रस्ताव मुंबई- दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्याकरिता ४२५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर झाला आहे. प्रख्यात वास्तुविशारद शशी प्रभू यांनी हा प्रस्ताव दिला आहे. याखेरीज जेकब व मेकफर्लेन या फ्रेंच कंपनीनेही आपले आराखडे सादर केले असले तरी खर्चाचा तपशील सादर केलेला नाही.शशी प्रभू यांचे सादरीकरण हे अधिक सखोल असून त्यांनी स्मारकाच्या खर्चाचा तपशील दिला आहे. प्रवेशद्वार, स्तूप, वाहनतळ क्र. १ व २, म्युझियम, वाचनालय, सभागृह, लोकांना एकत्र जमा होण्याचे ठिकाण आणि विविध सेवा याकरिता २३ हजार २९५ चौरस मीटर बांधकाम करण्याकरिता २१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्याचे बांधकाम पाडून टाकणे, आवार भिंत बांधणे, सौर ऊर्जेद्वारे पाणी उकळण्याची यंत्रणा बसवणे, मलनि:सारण व्यवस्था, पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा निर्माण करणे, विद्युतीकरण अशा विविध कामांचा विचार करता ३८६ कोटी खर्च होणार असून शशी प्रभू यांची सल्लागार या नात्याने फी ३८ कोटी ६५ लाख रुपये असणार आहे.स्मारकाच्या उभारणीबाबत निर्णय घेण्याकरिता मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.ए. मदान यांना दिल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)