बनावट कागदपत्रांद्वारे ४३ लाखांचा अपहार गैरव्यवहार : तोंदे विकास सोसायटीच्या सचिवासह शिपायावर गुन्हा
By admin | Published: January 03, 2016 12:03 AM
धुळे : तोंदे, ता.शिरपूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ८६ सभासदांच्या नावे बनावट कागदपत्रांआधारे सुमारे ४३ लाख रुपयांचे कर्ज काढून त्या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विकास सोसायटीच्या सचिवासह शिपायावर थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित फरार झाले आहेत.
धुळे : तोंदे, ता.शिरपूर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ८६ सभासदांच्या नावे बनावट कागदपत्रांआधारे सुमारे ४३ लाख रुपयांचे कर्ज काढून त्या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विकास सोसायटीच्या सचिवासह शिपायावर थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयित फरार झाले आहेत.याबाबत तोंदे विकासोचे संचालक दिलीप दत्तात्रय चौधरी (४८, रा.तोंदे, ता.शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तोंदे विकास सोसायटीचे सचिव श्रीराम भावसिंग पावरा (वय ३६, रा.भिलाटीपाडा, आंबे, ता.शिरपूर) व शिपाई सुरेश माणिक पाटील (वय ४०, रा.तोंदे, ता.शिरपूर) यांनी संगनमताने सोसायटीच्या सभासदांची कोणतीही परवानगी न घेता, सभासद स्वत: कर्ज घेत असल्याचे भासवले. सभासदांच्या नावांचे बनावट सातबारा उतारेदेखील दोघांनी तयार केले. त्याचप्रमाणे कर्ज मागणी अर्जावर सभासद व जामिनदारांच्या बनावट स्वाक्षर्या करून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सरकारी बॅँकेतून कर्ज उचलले. कर्ज मागणी अर्जासोबत लागणारे इतर कागदपत्रेही त्यांनी बनावट तयार करत सोसायटीच्या ८६ सभासदांच्या नावे कर्ज दाखवून एकूण ४२ लाख ९५ हजार ४८६ रुपयांच्या कर्जाच्या रकमेचा अपहार केला. या फिर्यादीवरून श्रीराम पावरा व सुरेश पाटील यांच्याविरुद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४६६, ४६७, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एन. तलवारे करीत आहेत.