"४४ आमदार आमच्या संपर्कात, जानेवारीत कोसळणार काँग्रेस सरकार"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 05:13 PM2023-09-18T17:13:40+5:302023-09-18T17:16:34+5:30
काँग्रेस कार्यकारिणीची हैदराबादमध्ये २ दिवसीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना व्यासपीठावर बोलूच दिलं नाही. त्यावरुन, भाजपने काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे.
बंगळुरू - कर्नाटकमध्ये भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रसने एकहाती सत्ता मिळवत कर्नाटकमध्ये सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सुरू असलेली स्पर्धा अखेर दिल्लीतून आदेश आल्यानंतर संपली. त्यामुळे, सिद्धरमैय्या हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले आणि डीके शिवकुमार वेटींगवर राहिले. आता, काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचा दावा भाजपा आमदाराने केला आहे. देशातील काही राज्यात सत्ताधारी पक्षाला सुरुंग लावत भाजपने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे, कर्नाटकमध्येही भाजपाचाच तोच प्रयत्न आहे का, असा प्रश्न आमदाराच्या या दाव्यानंतर उपस्थित होत आहे.
काँग्रेस कार्यकारिणीची हैदराबादमध्ये २ दिवसीय बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांना व्यासपीठावर बोलूच दिलं नाही. त्यावरुन, भाजपने काँग्रेसवर हल्ला बोल केला आहे. भाजपा नेता बसनगौडा आर पाटील यांनी म्हटले की, काँग्रेसने वरिष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांना महत्त्व दिले नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, हरिप्रसाद यांनी सिद्धरमैय्या यांच्याबाबतीत अनेक गोष्टी बोालून दाखवल्या आहेत. त्यामुळेच, जानेवारी महिन्यानंतर येथील सरकार कोसळणार, असा दावा बसनगौडा यांनी केलाय.
काँग्रेसचे ४४ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही बसनगौडा आर. पाटील यांनी केला आहे. आता, आम्हीच सत्तेत येत आहोत, मग विरोधी पक्ष निवडीचा त्रास कशाला घ्यायचा, असेही पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, हैदराबाद येथे आयोजित काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बीके हरिप्रसाद, मुख्यमंत्री सिद्धरमैय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे तिन्ही नेते होते. मात्र, येथे हरिप्रसाद यांना बोलण्याची संधी दिली नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही येथे व्यासपीठावर भाषण केले. तर, हरिप्रसाद यांना मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे, ते नाराज असल्याची चर्चा आहे.