नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात आता डेंग्यूने थैमान घातले आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. तापामुळे 10 दिवसांत तब्बल 53 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 186 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जवळपास 45 चिमुकल्यांनी डेंग्यूमुळे आपला जीव गमावला आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच फिरोजाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वॉर्डमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू झाल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा एका आठवड्यासाठी बंद केल्या आहेत.
फिरोजाबादमध्ये आतापर्यंत डेंग्यू आणि तापामुळे 45 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची अचानक पाहणी केली, त्यांनी आरोग्य सेवांचाही आढावा घेतला. शेकडो मुलांवर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात आणि गावातही उपचार सुरू आहेत. डेंग्यूची वाढती प्रकरणे पाहता जिल्हा दंडाधिकारी चंद्र विजय यांनी 6 सप्टेंबरपर्यंत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, डेंग्यूच्या वाढत्या घटनांमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही शाळाचालकाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा; ब्लड बँकेत मोठी गर्दी
रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच ब्लड बँकेतही मोठी गर्दी झाली आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यातील लोकांना डेंग्यूची लागण होत आहे. मथुरामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शेकडो लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाराणसीमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. डेंग्यूमुळे रुग्णांच्या प्लेटलेट्सं कमी होत आहेत. त्यामुळेच ब्लड बँकेत मोठी गर्दी होत आहे. वाराणसीमध्ये 55 लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर काही दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याला देखील डेंग्यूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
सरकारी रुग्णालयात तर रुग्णसंख्या वाढल्याने गंभीर परिस्थिती
मथुरातील एका गावामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. डॉ. रचना गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची टीम ही रुग्णांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन मलेरिया, डेंग्यू आणि कोरोनाची चाचणी करत आहे. सरकारी रुग्णालयात तर रुग्णसंख्या वाढल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शिबिरांचं आयोजन करून रुग्णावंर उपचार केले जात आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.