ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, ७ - ४.५ कोटींची रोख रक्कम आणि ८५ कोटींचे सोने हे आकडे कुबेराच्या खजिन्याचे नाहीत तर एका मंत्र्याच्या घरात आढळलेल्या बेहिशोबी मालमत्तेचे आहेत. प्राप्तिकर विभागाने आज तामिळनाडूचे आरोग्यमंत्र सी. विजयभास्कर यांच्या घरावर छापा मारून ही काळी माया जप्त केली आहे. या कारवाईदरम्यान मंत्र्यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
आज प्राप्तिकर विभागाने तामिळनाडूमधील चेन्नईसह आसपासच्या जिल्ह्यात छापे टाकले. ही कारवाई सकाळी सहा वाजता सुरू करण्यात आली. विजयभास्करन यांच्या अधिकृत निवास्थानी प्राप्तिकर विभागाचे १० अधिकारी सकाळी दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवानही तैनात होते.
ज्या व्यक्तींच्या घरांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. त्यांच्यामध्ये तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांसह त्यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता. विजयभास्कर हे .आरके नगर विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणावर पैसेवाटण्यामध्ये गुंतलेले होते, अशी माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरके नगर विधानसभा मतदारसंघात १२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान, विजयभास्कर यांच्या समर्थकांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांच्या घरासमोर समर्थकांनी गर्दी केली. तसेच माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान विजय भास्कर यांचेही नाव चर्चेत होते. माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी मला बाजूला हटवण्यात विजय भास्कर यांचा हात असल्याचा आरोपही केला होता. शिवाय पार्टी सोडण्यासाठी दबाव टाकल्याचेही त्यांनी सांगितले होते.