हैदराबाद : कोविड-१९ च्या साथीचा सौदी अरबियातील भारतीय कामगारांनाही फटका बसला असून बेरोजगारीमुळे आणि कामाच्या परवान्याची मुदतही संपल्याने ४५० भारतीय कामगारांवर जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली. तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, काश्मीर, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पंजाब आणि महाराष्टÑातील कामगारांच्या कामासाठीच्या परवान्याची मुदत संपल्याने जगण्यासाठी त्यांना भीक मागून जगण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
एका कामगाराने व्हिडिओत सांगितले की, माझ्या भावाचे निधन झाले असून आईची प्रकृती गंभीर आहे. मला भारतात पाठवा. डिटेन्शन सेंटरमध्ये रवानगी करण्यात आलेल्या कामगारात उत्तर प्रदेशचे ३९, बिहार १०, तेलगंणा ५ आणि महाराष्टÑ, जम्मू काश्मीर, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या प्रत्येकी चौघांचा समावेश आहे. सौदी अरबियात २६ लाख भारतीय काम करतात. यापैकी २.४ लाख भारतीयांनी भारतात परतण्यासाठी नोंदणी केली होती.यापैकी ४९,००० कामगार भारतात परतले आहेत, असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लोकसभेत सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते आणि एमबीटी नेते अजमद उल्लाह खान यांनी सांगितले की, मुदत संपल्यानंतरही वास्तव्य केल्यामुळे स्थानिक प्रशासनाने या भारतीय कामगारांची रवानगी स्थानबद्ध केंद्रात (डिटेन्शन सेंटर) केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्टÑमंत्री एस. जयशंकर, नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी आणि सौदी अरेबियातील भारतीय राजदूत औसफ सईद यांना पत्राद्वारे या भारतीय कामगारांना केंद्र सरकराने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जेद्दाहस्थित भारतीय महावाणिज्य दूतावासाने सांगितले की, वाणिज्य दूतावास आणि विदेश मंत्रालय आणि सौदी सरकारशी संपर्कात आहे. प्रवासी भारतीय साह्यता केंद्राने या कामगारांना भारतात आणण्यासाठी त्यांचे फोन नंबर, कुटुंबांचे पत्ते मागावले आहेत.