जिवंत लोकांना मृत दाखवून ४६ लाख लाटले; मध्यप्रदेशातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:27 AM2021-08-30T08:27:28+5:302021-08-30T08:27:34+5:30
बौहनाखैरी गावात २३ जणांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे.
छिंदवाडा (मध्यप्रदेश) : छिंदवाडा जिल्ह्यात २३ जणांच्या बनावट मृत्यू प्रमाणपत्रांच्या आधारे श्रमिकांसाठी असलेल्या सरकारच्या विविध योजनांमधून तब्बल ४६ लाख रुपये लाटल्याचे प्रकरण समोर आले असून, मध्यप्रदेशचे शेतकरी कल्याण व कृषी विकास मंत्री कमल पटेल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
बौहनाखैरी गावात २३ जणांचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे तसेच चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे पटेल यांनी सांगितले. २३ जणांचे बनावट मृत्यू प्रमाणपक्ष काढल्यानंतर त्यावरून प्रत्येकी दोन लाख रुपयांचा निधी लाटण्यात आला. या योजनेत मजुराच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. उपविभागीय अधिकारी अतुल सिंह यांनी सांगितले की, तहसीदारांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. यात जिल्ह्याचा किंवा पंचायतचा कोणी अधिकारी अडकलेला आढळल्यास त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल.
मी जिवंत, तरीही अनुदान लाटले
याबाबत एक श्रमिक विनोद पाल याने सांगितले की, मी जिवंत असलो तरी मला मृत दाखवून दोन लाख रुपये लाटण्यात आले आहेत. बौहनाखौरी गावाची लोकसंख्या २,८०० आहे. मागील दोन वर्षांत येथे १०६ लोकांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहेत.