नवी दिल्ली : कोची- सुन्नी दहशतवादी आयएसआयएसच्या ताब्यात अडकलेल्या ४६ भारतीय नर्सची मुक्तता झाली असून, एअर इंडियाच्या विशेष विमानाने त्यांना भारतात परत आणले जात आहे. हे विशेष विमान अर्बिलकडे रवाना झाले. या नर्स शनिवारी सकाळी कोचीला पोहोचतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी अनेक नाट्यमय घटनांनंतर त्यांची सुटका झाली आहे. संघर्ष चालू असलेल्या तिक्रीत शहरातून जबरदस्तीने हलविल्यानंतर शुक्रवारी त्यांची सुटका करण्यात आली. अर्बिल येथील भारतीय अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क झाला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नवी दिल्ली येथे पत्रकारांना सांगितले. अर्बिल हे शहर उत्तर इराकमध्ये असून, कुर्दीस्तानची राजधानी आहे. इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचे गाव असणाऱ्या तिक्रीत येथील रुग्णालयात या नर्स काम करत असत. ९ जून रोजी सुन्नी दहशतवाद्यांनी संघर्ष सुरू केल्यानंतर त्यांचे हाल सुरू झाले. गुरुवारी आयएसआयएस दहशतवाद्यांनी त्यांना जबरदस्तीने या रुग्णालयातून हलवले व २५० कि.मी. वरील मोसुल येथे नेले. अर्बिल विमानतळ मोसुलपासून ७० कि.मी.वर आहे. या नर्सची शुक्रवारी सकाळी मुक्तता करण्यात आली असून, त्यांना अर्बिल येथे पाठविण्यात आले. या नर्स आता सुरक्षित आहेत, इराकमधून सर्व भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे देशात आणल्याखेरीज आम्हाला चेन पडणार नाही असे हा प्रवक्ता म्हणाला. त्यांना आणणाऱ्या विमानात एक आयएफएस अधिकारी व केरळमधील एक आयएएस महिला अधिकारी प्रवास करत आहेत. केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी यासंदर्भात स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली. नर्सेस अर्बिलला पोहोचल्या असून, शनिवारी सकाळी कोची येथे पोहोचतील असे चंडी म्हणाले. भारत सरकार, बगदादमधील भारतीय दूतावास व राज्य सरकार सर्वांच्या एकत्र प्रयत्नातून नर्सना भारतात परत आणण्यात यश मिळाले आहे, असे चंडी म्हणाले. सकाळी ६.४० वाजता हे विमान कोची येथे पोहचेल. इराकमध्ये संघर्ष सुरू होण्यापूर्वी १० हजार भारतीय होते, सुन्नी दहशतवाद्यांनी इराकमधील तिक्रीत व मोसूल ही दोन महत्त्वाची शहरे ताब्यात घेतली असून, इराक व सिरियातील जिंकलेल्या प्रदेशात इस्लामी राज्याची स्थापना केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४६ भारतीय नर्सेसची मुक्तता
By admin | Published: July 05, 2014 5:07 AM