ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. 15 - आसाममधील एक दोन नाही तर तब्बल 46 मौलानांनी 16 वर्षांची गायिका नाहिद आफरीनविरोधात फतवा जारी केला आहे. नाहिद आफरीन 2015 मध्ये रिअॅलिटी शो इंडियन आयडल ज्युनिअरमध्ये फर्स्ट रनर अप होती. आफरीनला लोकांसमोर गाणं गाण्यापासून रोखता यावं यासाठी हा फतवा जारी करण्यात आला आहे.
पोलीस अधिका-यांचं म्हणणं आहे की, नाहिदने काही दिवसांपुर्वी दहशतवादासोबत इसीसचा विरोध करणारी गाणी गायली होती. त्यामुळे जारी करण्यात आलेला फतवा या गाण्यांवरुन उमटलेली प्रतिक्रीया तर नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक विशेष पथक पल्लब भट्टाचार्य यांनी आम्ही या बाजूनेही प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं आहे.
मंगळवारी मध्य आसाममधील होजई आणि नागाव जिल्ह्यात काही पत्रकं वाटण्यात आली ज्यामध्ये आसामी भाषेत फतवा आणि फतवा जारी करणा-यांची नावे लिहिण्यात आली होती. फतव्यानुसार 25 मार्च रोजी आसाममधील लंका परिसराक उदाली सोनई बाबी कॉलेजमध्ये नाहिदचा कार्यक्रम होणार असून हा पुर्णपणे शरियाच्या विरुद्ध आहे. फतव्यात सांगितल्याप्रमाणे, 'म्यूझिकल नाईटसारख्या गोष्टींना शरियात स्थान नाही. अशा गोष्टी जर मशीद, मदरसा आणि दफनभुमीजवळ होऊ लागल्या तर आपल्या पुढील पिढीला अल्लाहच्या नाराजीला सामोरं जावं लागेल'.
फक्त 16 वर्षांची असलेली गायिका नाहिद आफरीन सध्या दहावीत शिकत आहे. फतव्याच्या माहिती मिळताच तिला अश्रू अनावर होऊ लागले. 'मी यावर काय बोलणार. मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. मला मिळालेलं संगीत हे देवाचं देणं मला मिळालेला आशिर्वाद आहे. अशा धमक्यांना घाबरुन मी संगीतापासून दूर जाणार नाही', अशी प्रतिक्रिया नाहिदने दिली आहे.
Was shocked & broken from inside at first, but many Muslim singers gave me inspiration to not quit music, will never do so: Nahid Afreen pic.twitter.com/6RAmbs38dp— ANI (@ANI_news) March 15, 2017
'कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रम रद्द होणार नाही असं कळवल्याचं', नाहिदच्या आईने सांगितलं आहे. पोलिसांनी नाहिद आणि तिच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. नाहिदने 2016 मध्ये सोनाक्षी सिन्हाच्या अकीरा चित्रपटात गाणं गायलं आहे. इंडियन आयडलमध्येही तिला चांगलं यश मिळालं होतं.