नवी दिल्ली : यावर्षी प्रचंड उष्णतेमुळे उत्तर भारतात तापानाचा पारा उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या ३ महिन्यांत ५६ पुष्टी झालेल्या उष्माघाताच्या मृत्यूंची नोंद झाली आहे, त्यापैकी ४६ लोकांचा मृत्यू एकट्या मे महिन्यात झाला आहे. या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात सर्वाधिक १४ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर या यादीत महाराष्ट्र (११), आंध्र प्रदेश (६) आणि राजस्थान (५) यांचा समावेश आहे.
उष्मा-संबंधित आजार आणि त्यामुळे झालेले मृत्यूंचा केंद्र सरकार लेखाजोखा ठेवत असते. भारतीय हवामानशास्त्र विभागच्या (आयएमडी) मते एप्रिल महिन्यात ५ ते ७ तारखेदरम्यान पूर्व आणि आग्नेय भारतामध्ये दोन तीव्र उष्णतेच्या लाटांचा प्रभाव होता; या तीव्र उष्णतेच्या लाटा १५ आणि ३० एप्रिल दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि दक्षिण भारतापर्यंत विस्तारल्या.
आयएमडीनुसार उष्णेतच्या लाटांचा दुसरा टप्पा १६ ते २६ मे दरम्यान होता. या उष्णतेच्या लाटेमुळे राजस्थानमध्ये तापमान ५० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. तसेच दिल्ली-एनसीआर भागात ५ ते ७ दिवस उष्णतेची तीव्र लाट होती. दक्षिण हरयाणा, नैऋत्य उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये या लाटांमुळे कमाल तापमान ४४ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या मोसमात ४ ते ८ दिवस उष्णतेची लाट अपेक्षित असते.
“उष्णतेच्या काळात, पूर्व भारतातील किनारी भागात सापेक्ष आर्द्रता ५० % पेक्षा जास्त आणि वायव्य भारतात सुमारे २० ते ३० % होती. याचा आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. यावर्षी मोठ्या संख्येने लोक तीव्र उष्णतेने प्रभावित झाले, असे आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.