पणजी : ‘माय नेम इज लखन...’ आणि ‘धक धक करने लगा...’ या गाण्यांच्या तालावर अभिनेता अनिल कपूर याने व्यासपीठावर नृत्य सादर केले आणि त्या तालावर हजारो प्रेक्षक उत्स्फूर्तपणे थिरकले. ४६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पणजी नजीकच्या ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात शुक्रवारी सायंकाळी शानदार उद्घाटन झाले व त्या वेळी अनिल कपूरचे नृत्य वैशिष्ट्यपूर्ण ठरले.केंद्रीय मंत्री अरुण जेटली, केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, राज्यपाल मृदुला सिन्हा, गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष दामोदर नाईक आदींच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे अनिल कपूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून इफ्फीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आयोजक-प्रेक्षकांच्या आग्रहास्तव अनिल कपूरने नृत्य सादर केले. भारतीय चित्रपटांनी उत्तुंग भरारी मारली असून इफ्फीने ओळख निर्माण केली आहे, असे जेटली या वेळी म्हणाले. (खास प्रतिनिधी)इल्लयाराजा यांना शताब्दी पुरस्कारतमिळनाडूचे विख्यात संगीतकार पद्मभूषण इल्लयाराजा यांना या वेळी शताब्दी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अनिल कपूर व जेटली यांच्या हस्ते हा पुरस्कार इल्लयाराजा यांना प्रदान करण्यात आला. संगीतामध्ये फार मोठी शक्ती असते. देशातील सर्व विद्यालये व महाविद्यालयांमध्ये संगीत शिकणे सक्तीचे करा. यामुळे देशातील हिंसाचाराचे प्रमाण एकदम कमी होईल, असे मत इल्लयाराजा यांनी या वेळी मांडले.
४६ व्या इफ्फीचे शानदार उद्घाटन
By admin | Published: November 21, 2015 1:59 AM