नवी दिल्ली : काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पदभार स्वीकारताच परंपरेनुसार कार्यकारिणी सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर नव्या अध्यक्षांनी ४७ सदस्यीय सुकाणू समिती गठित केली.
मावळत्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, राहुल गांधी आदींचा या समितीत समावेश असून पक्षाचे महाअधिवेशन होईपर्यंत ही समिती कार्यरत राहील, अशी माहिती सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. जुन्या कार्यकारिणीतील सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा नव्या सुकाणू समितीत समावेश आहे.
खरगे यांनी सामूहिक नेतृत्वावर विश्वास दाखवला असून गरज पडेल तेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या दोघांनी देशासाठी चांगले कार्य केले आहे. पक्षाच्या हितासाठी मी त्यांचा सल्ला घेत राहील. त्यांचा सल्ला आणि समर्थन मी निश्चितच घेत राहीन, असे ते म्हणाले होते.