लखनौ : शीख भाविकांना दहशतवादी ठरवून त्यांना बनावट चकमकीत ठार मारल्याप्रकरणी येथील सीबीआय न्यायालयाने सोमवारी तब्बल ४७ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे प्रकरण २५ वर्षांपूर्वीचे असून, उत्तर प्रदेशातील पिलिभीत जिल्ह्यात ते घडले होते. शीख भाविकांना १२ जुलै १९९१ रोजी नेणारी एक खासगी लक्झरी बस मधील १0 भाविकांना जबरदस्तीने बसमधून उतरवले होते. त्या १0 भाविकांचे तीन गट करून पोलिसांनी त्यांना तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि त्यांना गोळ्या घालून ठार मारले होते. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आम्ही १0 खलिस्तानवाद्यांना चकमकीत मारल्याचा दावा प्रसिद्धी माध्यमांपुढे केला होता. यातील काही जणांविरुद्ध गुन्हे असल्याचेही आणि चकमकीत मरण पावलेल्यांकडून शस्त्रे हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असल्याचे लक्षात येताच सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले होते.पोलिसांनी मरण पावलेल्यांचे घाईघाईने शवविच्छेदन करून लगेचच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्याचे सीबीआय तपासात आढळून आले. तसेच मरण पावलेल्यांवर कोणतेही गुन्हे नव्हते आणि ते खरोखरच निर्दोष व भाविक होते, हेही उघडकीस आले. त्यामुळे ५७ पोलिसांवर सीबीआयने न्यायालयाने आरोपपत्र दाखल केले. या खटल्याचा निकाल आज लागला आणि ५७ पैकी ४७ जणांना जन्मठेप ठोठावली. तर १0 पोलीस खटला सुरू असताना मरण पावले. (वृत्त संस्था)
४७ पोलिसांना जन्मठेप
By admin | Published: April 05, 2016 2:07 AM