६ वर्षांत विजेच्या धक्क्याने ४७४ हत्तींचा मृत्यू; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 08:45 AM2021-08-31T08:45:13+5:302021-08-31T08:45:26+5:30
२०१४ ते २०२० चा कालावधी; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव
कोची : २०१४ ते २०२० या कालावधीत ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. अशा सर्वाधिक घटना आसाममध्ये घडल्या आहेत. त्यानंतर ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो. मानव व वन्यप्राणी यांच्यातील वाढता संघर्ष, जंगलांवर माणसाने केलेले आक्रमण यांसारख्या कारणांमुळे इतर प्राण्यांप्रमाणेच रानटी हत्तींचे अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे पाय वळत आहेत. त्यांना अटकाव करण्यासाठी वीजप्रवाह सुरू असलेल्या तारांचे कुंपण शेती, मळ्याला घातले जाते. तिथे विजेचा झटका लागून हत्ती मरण पावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.
जगातील आशियाई हत्तींपैकी निम्मे म्हणजे २७,३०० हत्ती एकट्या भारतामध्ये आहेत. विजेचा धक्का लागून मरण पावणाऱ्या हत्तींबाबत माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय वन व पर्यावरण खात्याने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, पूर्वी हत्तींची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जायची. पण आता विजेच्या तारांच्या धक्क्याने हत्ती मरण पावण्याचे प्रमाण वाढले आहे.
केंद्रीय वने व पर्यावरण खात्याने म्हटले आहे की, २०१४ ते २०२० या कालावधीत ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. अशा सर्वाधिक घटना आसाममध्ये घडल्या आहेत. तिथे ९० हत्ती मरण पावले. त्यानंतर ओडिशामध्ये ७३, तामिळनाडूमध्ये ६८, कर्नाटकमध्ये ६५, केरळात २४ हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांत माणूस व प्राणी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगसारख्या घटकांचीही भर पडली आहे. केंद्र सरकारने वनव्यवस्थापन धोरणाचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)
संघर्ष आणखी तीव्र होणार
आशियाई हत्ती या विषयाचे तज्ज्ञ डॉ. पी. एस. इसा म्हणाले की, जंगलांवर माणसाने आक्रमण केले आहे. ज्या ठिकाणी जंगलात पुरेसे अन्न मिळत नाही, तिथे हत्ती अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे आपला मोहरा वळवितात. माणूस व वन्यप्राण्यांमधील संघर्ष भविष्यात आणखी तीव्र होण्याची लक्षणे आहेत.