ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - नोकरीत अडचणी निर्माण झाल्यामुळे सौदी अरबियातून जवळपास 4870 भारतीय कामगार भारतात परत आल्याची माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली.
लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी सांगितले की, सौदीमधील सौदी ओगर आणि द साद ग्रृप या दोन मोठ्या कंपन्यांना काही अडचणी आल्यामुळे येथील भारतीय कामगारांवर परिणाम झाला. तसेच, सौदी अरेबियातून जवळपास 4870 भारतीय कामगार भारतात परत आले आहेत. नोक-या गमावलेल्या भारतीय कामगारांना मदत करण्याचे आवाहन सौदीतील प्रशासनाला करण्यात आले आहेत. तसेच, त्यांना भारतात येण्यासाठी लागणा-या व्हिसा, तिकिटांवर सुट किंवा मोफत सुविधा देण्यात आल्याचेही व्ही. के. सिंह यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, याआधीही परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सौदीतील नोक-या गमावल्यामुळे भारतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या समस्येवर आपले व्यक्तीगत लक्ष आहे, असे लोकसभेत सांगितले होते. तसेच, गेल्या काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियामधील बेरोजगार भारतीय कामगारांना मोफत रेशन देण्याच्या रियाधमधील भारतीय दूतावासाला सूचना देण्यात आल्या होत्या.