लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : Lok Sabha MP Suspension ( Marathi News ) संसदेच्या दोन्ही सभागृहांतून सोमवारी ७८ खासदारांना निलंबित केल्यानंतर मंगळवारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी लोकसभेतून आणखी ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांतील निलंबित विरोधी खासदारांची एकूण संख्या १४१ वर पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सहापैकी एकाही खासदाराचे निलंबन झालेले नाहीय, तर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित खासदारांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, काँग्रेस नेते शशी थरूर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आदी खासदारांचा समावेश आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडताना विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे विरोधी पक्षांचे खासदार निराश असल्याचा आरोप केला.
निलंबन कशामुळे?संसदेतील घुसखोरीप्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन करावे, या मागणीवर विरोधक ठाम आहेत, दोन्ही सभागृहात दररोज त्यावरून गदारोळ होत असून, अध्यक्ष आणि सभापतीना वारंवार कामकाज स्थगित करावे लागत आहे.
विरोधक ज्या पद्धतीने वागत आहेत, त्यामुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची संख्या आणखी कमी होईल. पुन्हा विरोधी बाकांवरच बसण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
'दडपशाही' विधेयके चर्चेविना मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षांना सभागृहातून बाहेर काढले जात आहे. भाजपला या देशातील लोकशाही नष्ट करायची आहे. - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
आता शिल्लक किती?■ इंडिया आघाडीचे जवळपास दोन तृतीयांश सदस्य निलंबित झाले.■ लोकसभेत इंडिया आघाडीची संख्या १३८ आहे. त्यापैकी केवळ ४३ खासदार शिल्लक राहिले आहेत.■ लोकसभेत आता ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधींसह काँग्रेसचे केवळ नऊ सदस्य उरले.■ तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील २२ पैकी १३, द्रमुकचे २४ पैकी १६, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे तीन खासदार निलंबित झाले.