पुणे : भारत दूरसंचार निर्माण लिमिटेडला (बीएसएनएल) येत्या १ एप्रिलपासून फोरजी स्पेक्ट्रम मिळणार आहे. मात्र, ग्राहकांना दर्जेदार फोरजी सेवा देण्यासाठी ऑक्टोबर २०२० उजाडेल, अशी माहिती बीएसएनएल बोर्डाच्या मनुष्यबळ विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी सोमवारी दिली. बीएसएनएलला फोरजी सेवेची परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे उशीरा का होईना बीएसएनएलची फोरजी सेवा उपलब्ध होणार आहे. याबाबत माहिती देताना वडनेरकर म्हणाले, केंद्र सरकारने बीएसएनएलला मजबूत करण्यासाठी फोरजी सेवेची परवानगी दिली आहे. तसेच, सरकारी हमी असलेल्या बॉँडच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपये उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देखील उपलब्ध होईल. त्याच जोडीला देशभरातील बीएसएनएलच्या जमिनींच्या विक्रीतूनही निधी उभारला जाईल. त्यामुळे येत्या दोनवर्षात बीएसएनएल नक्कीच नफा मिळवेल. ग्रामीण भागामधे सेवा देण्यासाठी भारत एअर फायबर ही योजना सुरु केली असून, लवकरच राज्यभरात ही सेवा उपलब्ध होईल. ऑफ्टीकल फायबर आणि एअर सर्व्हीसद्वारे ही सेवा दिली जाईल. ग्रामीण भागातही इंटरनेटचा वेग ४० मेगा बाईट्स पर सेकंद (एमबीपीएस) होईल, असे वडनेरकर यांनी सांगितले. -* फाईव्ह जी दूर, मोबाईल दर पूर्ववत होतीलसध्या मोबाईल कंपन्या अडचणीतून जात आहेत. त्यामुळे कोणतीही कंपनी सध्या फाईव्हजीमधे गुंतवणूक करणार नाही. कारण त्यासाठी टॉवरची संख्या वाढवावी लागेल. तसेच, फायबर लाईनदेखील टाकाव्या लागतील. सध्या टेलिकॉम कंपन्यांना परवडणारे नसल्याने उशीरा फोरजी सेवा सुरु होऊनही फारसा परिणाम होणार नाही. उलट मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेमुळे सेवेचे दर अत्यंत कमी झाले आहेत. विकसित देशामधे आपल्यापेक्षा इंटरनेट डाटा अधिक किंमतीला दिला जातो. त्यामुळे इंटरनेटचे दर पुन्हा पूर्वपदावर येतील, असे अरविंद वडनेरकर यांनी सांगितले
बीएसएनएलची फोरजी सेवा ऑक्टोबरपासून कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 7:41 PM
उशिरा का होईना बीएसएनएलची फोरजी सेवा उपलब्ध होणार
ठळक मुद्देदेशभरातील बीएसएनएलच्या जमिनींच्या विक्रीतूनही निधी उभारला जाणारमोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेमुळे सेवेचे दर अत्यंत कमी