ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8- सध्याचं जगं हे इंटरनेटचं जग आहे. डिजीटल क्रांतीच्या या युगात सगळीकडेच इंटरनेटचा वापर केला जातो. तसंच विविध टेलिकॉम कंपन्यांकडून हाय स्पीड तसंत सुपर हाय स्पीड इंटरनेट सेवा दिल्या जातात. पण भारतामध्ये मात्र हाय स्पीड इंटरनेट द्यायचा टेलिकॉम कंपन्यांचा दावा पोकळ ठरतो आहे. 4 जी इंटरनेटच्या स्पीडच्या शर्यतीत भारत आता पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा मागे राहिलं आहे. अनेक क्षेत्रात भारताच्या कित्येक पट मागे असलेले पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश 4 जी इंटरनेटे सेवेच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे गेले आहेत.
भारतात ४ जी इंटरनेट डाऊनलोड स्पीडची सरासरी 5.1 Mbps इतकी आहे. जगाच्या इंटरनेट सरासरीपेक्षा ही सरासरी एक-तृतीयांश पेक्षाही कमी आहे. जागतिक स्तरावर थ्रीजी इंटरनेटची सरासरी 4.4 mbps इतकी असून भारतातील "4 जी"चा स्पीड यापेक्षा फक्त 0.7 mbpsनं अधिक आहे. त्याचवेळी जगातील "४ जी" इंटरनेट स्पीडची सरासरी तब्बल 16.2Mbps इतकी आहे.
देशात "जिओ"ने ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर देऊन टेलिकॉम विश्वात स्पर्धा निर्माण केली आहे. एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया यांनीही मैदानात उतरून इंटरनेटच्या दरांत मोठ्या प्रमाणावर घट केली आणि ग्राहकांना विविध ऑफर्स देऊ केल्या. पण, वास्तवात इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात ७४व्या स्थानावर आहे. भारतापेक्षा पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश पुढे आहेत. ४ जी इंटरनेटच्या स्पीडमध्ये सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे, तर दक्षिण कोरियाचा दुसरा क्रमांक लागतो.
ट्रायच्या माहितीनुसार, देशात काही ठिकाणी थ्रीजी स्पीड १० kbps पेक्षाही कमी आहे. तसंच देशातील इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये 1 मेगाबाइट प्रति सेकंदपेक्षाही अधिक घट झाली आहे, असं ट्रायने एका अहवालात म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये इंटरनेट स्पीडबाबत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.