ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - देशभरात डिजीटल इंडियाची चर्चा सुरू असताना एक वेगळंच वृत्त आलं आहे. 4जी स्पीडच्या बाबतीत भारतापेक्षा श्रीलंका आणि पाकिस्तान हे देशही पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगात 74 व्या स्थानावर आहे. याबाबतीत भारत केवळ कोस्टारिका या देशाच्या पुढे आहे.
4जी स्पीडच्या बाबतीत सिंगापूरचा अव्वल क्रमांक लागतो, तर दक्षिण कोरिया दुस-या क्रमांकावर आहे. 4G डाउनलोड स्पीडच्या जागतिक स्पीडची सरासरी 16.2 Mbps इतकी आहे.
भारतात 4G आणि हाय-स्पीड ब्रॉडबॅंडचा सरासरी डाउनलोड स्पीड 5.1 Mbps आहे, हा स्पीड जागतिक सरासरीच्या एक तृतियांशही कमी आहे. देशात सरासरी 3G स्पीड 1 Mbps पेक्षाही कमी आहे. इकॉनोमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार टेलीकॉम रेगुलेटर ट्रायनुसार काही युजर्ससाठी हा स्पीड 10Kbps पेक्षाही कमी असतो. गेल्या सहा महिन्यातील भारतातील डाउनलोड स्पीड 1Mbps पेक्षाही कमी झाला असल्याचं इकॉनोमिक टाइम्सने ओपन सिंग्नलच्या हवाल्याने म्हटलं आहे.
ओपन सिग्नलच्या रिपोर्टनुसार सिंगापूर 46.62 Mbps स्पीडसह एक क्रमांकावर आहे तर दुस-या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियामध्ये 4G स्पीड 43.46Mbps आहे. भारत 75 देशांच्या यादीत 5.14 Mbps च्या सरासरी स्पीडसह 74 व्या नंबरवर आहे तर पाकिस्तान 11.7Mbps स्पीडसह 68 व्या नंबरवर आहे.