- खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात असलेल्या एकूण ३४ न्यायाधीशांपैकी सुमारे एक तृतीयांश न्यायाधीश हे दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. तर सध्याच्या ३४ पैकी ४ न्यायाधीश हे वर्गमित्र आहेत.१९२४ मध्ये स्थापन झालेल्या दिल्ली विद्यापीठातील कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभिमान वाटण्यायोग्य ही बाब आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात कार्यरत कॅम्पस लॉ सेंटरचे १० विद्यार्थी न्यायाधीश आहेत. यात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचाही समावेश आहे. इतर ९ न्यायाधीश पुढीलप्रमाणे: आर. एफ. नरिमन, डी. वाय. चंद्रचूड, एस. के. कौल, नवीन सिन्हा, दीपक गुप्ता, इंदू मल्होत्रा, संजीव खन्ना, रवींद्र भट आणि हृषिकेश रॉय. या १० पैकी न्या. डी. वाय. चंद्रचूड, एस. के. कौल, रवींद्र भट व हृषिकेश रॉय हे वर्गमित्र असून, १९८२ मध्ये या सर्वांनी याच संस्थेतून कायद्याची पदवी घेतलेली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. आर. एफ. नरिमन व दीपक गुप्ता हेदेखील एकाच वेळी दिल्ली विद्यापीठात शिकत होते. १९७८ मध्ये या सर्वांनी कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याची पदवी घेतलेली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असलेले मदन लोकूर आणि ए. के. सिक्री हेदेखील दिल्ली विद्यापीठाचेच विद्यार्थी होते.देशाच्या निरनिराळ्या भागांतील निवासी असलेल्या या सर्वांनी दिल्ली विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदापर्यंत मजल मारली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यानंतर या १० पैकी ज्येष्ठतेप्रमाणे न्या. संजीव खन्ना ६ महिन्यांसाठी व त्यानंतर न्या. डी. वाय. चंद्रचूड हे मे २०२५पर्यंत सरन्यायाधीशपदावर नियुक्त होतील.
सुप्रीम कोर्टात ४ वर्गमित्र न्यायाधीश; एकाच विद्यापीठाचे दहा जण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 2:07 AM