हरियाणामधील यमुनानगर येथील माजी आमदार दिलबाग सिंह यांनी ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. ईडीने दिलेला अटकेचा आदेश रद्द करण्यासाठी विनंती केली आहे. तसेच ईडीच्या ताब्यातून त्वरित सुटका व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाच्या सिंगल बेंचने कुठलाही आदेश न देता रजिस्ट्रीला नियमानुसार योग्य पीठाकडे ही याचिका सूचिबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याने अटक आणि रिमांड आदेशांना रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिकार्ता माजी आमदार आहेत. माजी आणि विद्यमान आमदार आणि खासदारांकडून त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व फौजदारी खटल्याचं रोस्टर हायकोर्टाच्या एका विभागीय खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत हायकोर्टाच्या रजिस्ट्रीने या प्रकरणाकडे पाहावे आणि योग्य खंडपीठासमोर या प्रकरणाला सूचिबद्ध करावे.
दिलबाग सिंह यांना पाच दिवस चाललेल्या कारवाईनंतर ईडीने अटक केली होती. ४ जानेवारी रोजी ईडीने हरियाणामधील करनाल, सोनीपत आणि यमुनानगर येथे एकाच वेळी धाडी टाकल्या होत्या. या कारवाईत माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरातून पाच कोटी रुपयांची रोख रक्कम, चार परदेशी हत्यारं, १०० हून अधिक मद्याच्या बाटल्या आणि ४ ते ५ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. आता दिलबाग सिंह यांनी ईडीने केलेल्या अटकेला हायकोर्टात आव्हान दिलं आहे.
दिलबाग सिंह हे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. २००९ मध्ये दिलबाग सिंह यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. तर २०१४ मध्ये ते पुन्हा जिंकले. मात्र २०१९ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.