उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर ट्रक आणि बसमध्ये धडक झाली. खासगी बसची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेस वेवर बुधवारी रात्री उशिरा ट्रक आणि बसची धडक झाली. प्रतापगडच्या कृष्णा ट्रॅव्हल्सची डबल डेकर बस दिल्लीहून आझमगड आणि मऊकडे जात होती. यावेळी, यमुना एक्सप्रेस वेवर ५६ क्रमांकाच्या पॉईंटवर येताच बसची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले असून घटनेचा तपास सध्या सुरु आहे. या अपघातात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, पोलिसांनी सर्व जखमींना जेवार येथील कैलास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातील मृतांमध्ये एक महिला, तीन पुरुष आणि एका बालकाचा समावेश आहे.
दरम्यान, यापूर्वी १५ नोव्हेंबर रोजी गौतम बुद्ध नगरच्या दादरी भागात एका ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातात मोटारसायकलवर असलेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. तर महिलेचा पती आणि मूल गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.