नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टी सध्या नव्या अध्यक्षाच्या शोधात आहे. जे.पी नड्डा यांचा वाढवलेला कार्यकाळही संपुष्टात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी नवीन अध्यक्ष निवडीच्या नावांवर ५ तासांची दिर्घ बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष जे.पी नड्डा, भाजपा संघटन सचिव बीएल संतोष, आरएसएसचे महासचिव दत्तात्रय होसबाळे आणि संयुक्त महासचिव अरुण कुमार यांचाही सहभाग होता.
राहुल-अखिलेश फॅक्टरनं वाढवलं टेन्शन
यावर्षी ४ महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. पुढील वर्षी दिल्ली, बिहारसारख्या राज्यांत निवडणुका आहेत. त्यातच अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालानंतर भाजपासमोर नवीन अध्यक्ष निवडीचं आव्हान उभं राहिले आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्याक मतदारांनी भाजपाकडे पाठ फिरवत विरोधी इंडिया आघाडीला झुकतं माप दिलं आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादीने मिळून भाजपाला मोठा फटका दिला. त्यामुळे ओबीसी मतदारांना पुन्हा पक्षाकडे खेचण्यासाठी भाजपानं प्राधान्य दिलं आहे. त्यात यंदा भाजपा एखाद्या महिलेला पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष बनवून इतिहासही रचू शकते अशीही चर्चा आहे.
केव्हा होणार अध्यक्षपदाची निवडणूक?
भाजपाच्या नव्या अध्यक्ष निवडीच्या मुदतीबाबत सांगायचं झालं तर ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत केरळच्या पलक्कडमधील आरएसएस समन्वय बैठकीत होईल. मग ३१ ऑगस्टपूर्वी भाजपाचा नवीन अध्यक्ष निवडला जाईल का? भाजपाच्या राज्यस्तरीय संघटनांच्या निवडणुकाही होणार आहेत. कमीत कमी निम्म्याहून अधिक राज्यांच्या संघटनात्मक निवडणुकीनंतर राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाईल. तोपर्यंत कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करून पक्षाचा कार्यभार सोपवला जाऊ शकतो.
या नावांची होती चर्चा, परंतु...
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ज्या नावांची चर्चा होती त्यातील बहुतांश जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर यासारखी नावे आहेत. ज्याला राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं जाईल त्याचं ग्राऊंड पातळीवर मजबूत काम असावं असं भाजपा, आरएसएसला वाटतं. शिवराज सिंह चौहान चांगली पसंती होती परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना कृषीमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. परंतु हेदेखील सत्य आहे की, जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह जेव्हा भाजपाचे अध्यक्ष होते तेव्हा तेही केंद्रीय मंत्री होते.
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही गांभीर्याने विचार सुरू आहे. सध्या ते भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीत आघाडीवर आहेत. मात्र भाजपात आजही काही अंदाज लावणं कठीण आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा माध्यमांत जी नावे चर्चेत असतात त्यांची निवड होत नसल्याचं दाखवून दिलंय. देवेंद्र फडणवीस हे आरएसएस आणि मोदींचेही निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे भाजपा अध्यक्ष कोण बनणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.