नवी दिल्ली : एमआरपीपेक्षा अधिक किंमत ग्राहकांकडून आकारल्यास सरकार दुकानदारांवर आणखी कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील तक्रारींची संख्या वाढत असल्याने नुकतीच एक बैठक घेण्यात आली. असे करणाऱ्याच्या शिक्षेचा कालावधी वाढवण्याबाबत या बैठकीत विचार करण्यात आला. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हा प्रस्ताव स्वीकारल्यास एमआरपीपेक्षा अधिक किंमत आकारणा-यांना पाच लाख रुपये दंड आणि २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते.
मीडिया रिपोर्टनुसार, ग्राहक मंत्रालयाकडे प्रत्येक राज्यातून दुकानदारांविरोधात तक्रारी येत असतात. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०१७ ते २२ मार्च २०१८ पर्यंत ६३६ पेक्षा जास्त तक्रारी मिळालया आहेत. अशात मंत्रालयाने नियम आणखी कठोर करण्याचा विचार केलाय. हे प्रस्ताव लागू कारण्यासाठी लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट मध्ये संशोधन करावं लागेल.
सध्या किती दंड आणि शिक्षा?
एमआरपीपेक्षा जास्त किंमत आकारलयास सध्या जास्तीत जास्त एक लक्ष रुपये दंड द्यावा लागतो. तसेच पहिल्या चुकीसाठी २५ हजार रुपये दंड भरावा लागतो. ही रक्कम वाढवून १ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. दुस-यांदा चूक केल्यास ५० हजार रुपये दंड भरावा लागतो. ही रक्कम २. लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. तर तिसऱ्या चुकीवर १ लाख रुपये दंड आहे तो वाढवून ५ लाख रुपये करण्याचा विचार आहे.
यासोबत शिक्षाही अधिक कठोर केली जाऊ शकते. सध्या एक वर्षाच्या शिक्षेचा नियम आहे. प्रस्तावात ही शिक्षा १.५ वर्ष ते २ वर्ष करण्याचे बोलण्यात आले आहे. मंत्रालयाला सर्वात जास्त तक्रारी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून मिळतात. दिल्ली, हरयाणा, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू, ओरिसा आणि झारखंड येथूनही तक्रारी आल्या आहेत.
कशी करू शकता तक्रार?
एमआरपीपेक्षा जास्त किमतीत वस्तू विकणा-यांची तक्रार 1800-11-4000 या टोल फ्री क्रमांकावर करता येते. तसेच +918130009809 या क्रमांकावर एसएमएस करूनही तक्रार करता येते.