कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध फतवा काढणारे आणि ममता बॅनर्जी यांच्याकडून राखी बांधून घेत त्यांचे भाऊ बनलेले शाही इमाम नूर-उर- रहमान बरकतींनी आपली राजकीय दिशा बदलली आहे. बरकती यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यासंदर्भात स्टींग ऑपरेशन करण्यात आले आहे. मुस्लीम मतदारांना पैशाने बदलता येऊ शकते, असे बरकती यांनी म्हटले. याबाबत टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने स्टींग ऑपरेशन केले आहे.
बंगालमध्ये मुस्लिमांची भावना बदलली आहे. लोकांचा कल भाजपाकडे वाढला असून मुस्लीम लोकांच्या मनात भाजपाप्रेम बहरले आहे. भाजपाने 5 कोटी रुपये दिल्यास मी 5 लाख मुस्लीम मतदारांची सोय करू शकतो, असे बरकती यांनी म्हटले. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने 22 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. पण, भाजप बंगालमध्ये 28 जागा जिंकेल. जर, गतवर्षीच्या निवडणुकीत मुस्लिमांनी ममता यांना मतदान केलेच नसते, तर त्यांनी केलं असत, असे म्हणत बरकती यांनी ममता यांनाही टार्गेट केलं. तसेच भाजपाने पैसे दिल्यास मी त्यांच्यासाठी प्रचार रॅलींचे आयोजन करेन, असेही बरकती यांनी म्हटले.
याबाबत बरकती यांना विचारणा केली असता, सर्वात मोठा इमाम पैसा आहे. भाजपाजवळ पैसा आहे, जर ते बंगालमध्ये पैसा खर्च करतील, तर तुम्हीच पहाल मुस्लीम मतदान कशाप्रकारे भाजपाच्या पारड्यात पडेल, असे बरकती यांनी म्हटले. दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 10 टक्के मुस्लीम मतदान मिळेल. पण, सर्वच 30 टक्के मतदान हवे असल्यास भाजपला पैसे खर्च करावे लागतील, असा भविष्यवाणीपर सल्लाही त्यांनी दिला.
पाहा...