अलाप्पुझा - केरळच्या अलाप्पुझा भागात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघातात ५ MBBS च्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही मुले ज्या कारमधून प्रवास करत होती ती कार केरळ राज्य परिवहन मंडळाच्या बसला धडकली. ही घटना रात्री १० च्या सुमारास कलाकोड परिसराजवळ घडली. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात संपूर्ण कारचा चक्काचूर झाला. कारचे लोखंडी पार्ट वेगळे करून विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातातील मृत विद्यार्थी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चं शिक्षण घेत होते. कारमध्ये एकूण ७ जण प्रवास करत होते, त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. इतरांना जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या दुर्घटनेत बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. हा अपघात कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
अलाप्पुझा येथील टीडी मेडिकल कॉलेजमध्ये हे ५ विद्यार्थी एमबीबीएसच्या पहिल्या वर्गात शिकत होते. मृतकांमध्ये लक्षद्विपचा देवनंदन, मोहम्मद इब्राहिम, आयुष शाजी, श्रीदीप वलसन आणि मोहम्मद जब्बार याचा समावेश आहे. रेस्क्यू टीममध्ये या पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मेटल कटरचा वापर करून कारचे काही भाग कापावे लागले.
दरम्यान, अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. ५ जणांना मृत घोषित करण्यात आले. पावसामुळे रस्ता निसरता झाल्याचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. अपघाताचे कारण काय हे समोर येऊ शकले नाही.
आयपीएस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
सोमवारीही एका रस्ते अपघातात आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. कर्नाटकच्या हासनमध्ये पहिल्याच पोस्टिंगवर जात असताना ही दुर्घटना घडली. हर्षवर्धन हे कर्नाटक कॅडर २०२३ चे अधिकारी होते. ट्रेनिंगनंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग मिळाली होती. यामुळे ते रविवारी पोस्टिंगच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कारने निघाले होते. यावेळी कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला.