भोपाळ – मध्य प्रदेशच्या भोपाळ इथं एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ माजली आहे. आतापर्यंत कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंब प्रमुख संजीव जोशी यांनी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला. कुटुंबातील सदस्यांच्या सामुहिक आत्महत्येने परिसरात शांतता पसरली आहे. कुटुंबाने घेतलेल्या टोकाच्या निर्णयानं सगळेच हादरले आहेत.
शुक्रवारी या प्रकरणात संजीव जोशी यांची छोटी मुलगी पूर्वी आणि आई नंदिनी यांचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी मोठी मुलगी ग्रीष्मा हिने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर शनिवारी रात्रीच संजीव जोशी यांनीही अखेरचा श्वास घेतला. आता कुटुंबात केवळ संजीव जोशी यांची पत्नी वाचली आहे. ही घटना समजताच स्थानिक भाजपा आमदार गंभीर अवस्थेत उपचार घेणाऱ्या संजीव यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. संजीव जोशी कुटुंबाला त्यांनी २ लाखांची आर्थिक मदत केली. या मदतीचा फोटो सोशल मीडियात शेअर केल्यानंतर नेटिझन्सनं भाजपा आमदाराला ट्रोल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपुरा विधानसभा क्षेत्रातील आनंद नगर इथं कर्जाच्या बोझ्याखाली दबललेल्या कुटुंबाने आर्थिक दडपणाखाली येत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यातील ३ जणांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेत कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत केली. ही रक्कम स्थानिक भाजपा आमदारांच्या मार्फत पीडित कुटुंबाला देण्यात आली. या मदतीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेसने भाजपा आमदाराच्या या कृत्यावर अयोग्य असल्याचं सांगत संजीव जोशी यांच्या मृत्यूनंतर आयसीयूत गंभीर अवस्थेत उपचार घेणाऱ्या व्यक्तीसोबत फोटो काढल्याप्रकरणी FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी ट्विट करुन लिहिलं की, कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला ICU मध्ये चेक देताना आमदार कृष्णा गौर आणि त्यांच्या समर्थकांनी फोटोसेशन केले. त्यांचाही आज मृत्यू झाला आहे. ICU प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याप्रकरणी जबाबदार डॉक्टर, हॉस्पिटल प्रशासन आणि भाजपा नेत्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा.
काय आहे प्रकरण?
भोपाळमध्ये कर्जात बुडालेल्या एका मॅकेनिकने २ मुली, पत्नी आणि आईसह विष पिऊन आत्महत्या केली. या सामुहिक आत्महत्येसाठी त्यांच्या मागे पैशाचा तगादा लावणाऱ्या माणसांना जबाबदार धरण्यात येत आहे. पैसे वसूल करण्यासाठी या लोकांनी कुटुंबावर दडपण आणलं होतं. त्यामुळेच जोशी कुटुंबाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.