मुंबई : नथुराम गोडसे याच्याबद्दलच्या अभिमानास्पद वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चेचा विषय ठरलेल्या भाजपच्या प्रज्ञासिंह ठाकूर (भोपाळ) यांचा लोकसभेत लवकरच शपथविधी होईल. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे (उत्तर कन्नड) आणि नलिन कुमार कटील (दक्षिण कन्नड) यांच्यासह समाजवादी पक्षाचे आझम खान (रामपूर), तेजस्वी सूर्या (बंगळुरू साऊथ) आणि सनी देओल (गुरुदासपूर) आदी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. अनंतकुमार वगळता सर्व जण नव्यानेच संसद सदस्य झाले आहेत.
बहुतांश राजकीय पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांपासून उमेदवारांपर्यंत अनेकांची वक्तव्ये गेल्या दीड-दोन महिन्यांत वादग्रस्त ठरली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपच्या प्रमुख मायावती, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यांमुळे खळबळ झाली.त्यापैकी प्रज्ञासिंह ठाकूर प्रथमच लोकसभेत प्रवेश करत आहेत. महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे याचा उल्लेख राष्ट्रभक्त असा केल्याने त्या वादग्रस्त झाल्या. दक्षिणेकडील भाजपचे उमेदवार नलिन कुमार यांनी गोडसे याने केलेल्या खुनाची तुलना दिवंगत कॉँग्रेस नेत्यामुळे झालेल्या कथित हत्यांशी केली. नंतर त्यांनी ते विधान काढून टाकले. बंगळुरू साऊथचे भाजप उमेदवार तेजस्वी सूर्या हेसुद्धा निवडून आले आहेत. त्यांनी वर्षभर वादग्रस्त विधाने केली.
गुरुदासपूरमधून भाजपतर्फे प्रथमच निवडून आलेले सनी देओल बालाकोट हल्ल्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही, असे म्हटल्याने तेसुद्धा काहीसे वादग्रस्त झाले.उत्तर कर्नाटकचे भाजप उमेदवार अनंतकुमार हेगडे हेसुद्धा गोडसे याच्याविषयी केलेल्या ‘टिष्ट्वट’मुळे वादात सापडले.पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे आपल्या शापामुळे मरण पावले, या त्यांच्या विधानामुळे विशेषत: महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.