ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 10- संत भैय्यूजी महाराजांवर झालेल्या जीवघेणा हल्लाप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. काल भय्यूजी महाराज पुण्याहून इंदोरला जात असताना हा हल्ला करण्यात आला होता. रात्रीच्या 9 वाजण्याच्या दरम्यान पुण्यातील रांजणगावाजवळ त्यांच्या ऑडी कारला एका ट्रकनं धडक दिली आणि त्यानंतर 2 वाजताच्या दरम्यान त्यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रस्त्याशेजारील दुकानांमध्ये दडून बसलेल्या काही तरुण भय्यूजी महाराजांवर हत्यारांसह चाल करू गेले आणि त्यांनी चालकाला मारहाण केली. भय्यूजी महाराज कारमधून उतरल्यानंतर त्या तरुणांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण गाडीचालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं तिथून निघण्यात ते यशस्वी झाले. मात्र या हल्ल्यात सुदैवानं भय्यूजी महाराजांना कोणतीही दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे इंदौरमधल्या धर्म संमेलनात त्यांनी कार्यक्रमासाठी खर्च होणारा पैसा हा शेतक-यांमध्ये वाटला पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं. त्यामुळेच हा हल्ला झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 48 तासांत या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. पण इंदोरमध्ये पोहोचल्यानंतर भय्यूजी महाराजांच्या चालकानं रांजणगाव पोलिसात लेखी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरूनच 5 जणांना अटक करण्यात आली आहे.