ऑनलाइन लोकमत -
चंदीगड, दि 20 - जाट आरक्षण आंदोलनाने हिंसक वळण घेतलं असून या आंदोलनात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रोहतक आणि झज्जरमध्ये सुरक्षा जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये शनिवारी 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
लष्कराने फ्लॅग मार्च काढून शांततेच आवाहन केलं असतानादेखील आंदोलनकर्ते हिंसा करत आहेत. हरियाणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद असल्याने लष्कराला हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली होती. आंदोलनाच मुख्य केंद्र असलेल्या हरियाणामधून हे आंदोलन इतर जिल्ह्यांमध्ये पसरत आहे. हरियाणामधील अजून 5 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ज्यामध्ये जिंद, हिसार आणि हंसी या जिल्ह्यांचा समावेश आहे. याअगोदर सोनीपत आणि गोहानामध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर रस्ते आणि रेल्वे वाहतूकदेखील ठप्प झाली आहे. प्रशासनाने दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा, राजस्थान आणि चंदीगडमधील वाहतूक सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर बंद केली आहे.