लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या पाच राज्यांमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली. पंजाब वगळता अन्य चार राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचे सांगितले जाते. २०२२ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यात आपलीच सत्ता टिकून राहावी म्हणून भाजप प्रयत्नांची शिकस्त करणार आहे. योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अधूनमधून रंगत असते. त्यामुळे यासंदर्भात भविष्यात नेमका काय निर्णय होतो याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
शनिवारी झालेल्या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, स्मृती इराणी, किरण रिजिजू आदी नेते उपस्थित होते.
पंजाबकडेही लक्षपंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. या राज्यातही भाजपला पूर्वीपेक्षा अधिक यश मिळावे म्हणून रणनीती आखण्याचे ठरविले.