उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या हतरजगंज परिसरात ५ मजली इमारत अचानक कोसळली. या इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत ३ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इमारतीच्या मलब्याखाली आणखी रहिवाशी अडकले असण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती निवारण कक्षाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. आत्तापर्यंत ३ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. या इमारतीमध्ये ५० कुटुंब राहत होते.
वजीर हसन रोडवरील या इमारतीतील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी या घटनेची माहिती दिली. तसेच, ही इमारत अचानक कोसळली असून आत्तापर्यंत ३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि संबंधित यंत्रणांना घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून येथे बांधकामाचा आवाज ऐकू होत होता. मात्र, नेमकं कशाचं काम सुरू आहे, हे कोणालाच माहिती नव्हते. सध्या या इमारतीत ५० कुटुंब राहत असून १५० रहिवाशी संख्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.