नाशिक : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारांकडून जोरदार प्रचारही सुरू झाला आहे़ शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस दलही सज्ज झाले असून, शहरात ५ हजार ८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे़ यामध्ये परजिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांबरोबरच होमगार्डच्या जवानांचा अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे़ पोलीस आयुक्तालयातील ३ हजार ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, होमगार्डचे १ हजार ३०० जवान, ३०० अतिरिक्त पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या असे ५ हजार ८०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे़ यापैकी ४ हजार ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी केवळ बंदोबस्तासाठी असणार आहेत़ महापालिका निवडणुकीसाठी मागविण्यात आलेला परजिल्ह्यातील बंदोबस्त हा येत्या शुक्रवारपर्यंत (दि़१७) शहरात दाखल होणार आहे़ यामध्ये धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातून ३०० पोलीस कर्मचारी व एक हजार तीनशे होमगार्डचे जवान (त्यामध्ये २०० महिला होमगार्ड) वनविभागाचे २०० कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या (३०० कर्मचारी) असा २ हजार १०० पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त शहरात दाखल होणार आहे़ त्यामध्ये पोलीस आयुक्तालयातील ३ हजार ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी मिळून ५ हजार ८०० पोलीस बळ होणार आहे़ शहरातील विविध मतदान केंद्र, संवेदनशील मतदान केंद्र, रस्त्यावरील बंदोबस्त यासाठी ४ हजार ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तर उर्वरित कर्मचारी इतर कामासाठी वापरले जाणार आहे़ पोलीस प्रशासनाने संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची प्रभागनिहाय यादी तयार केली असून, त्याठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे़ शहरातील कायदा व सुव्यवस्थेसाठी शेकडो जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, काही सराईत गुन्हेगारांची तडीपारी तसेच मोक्कान्वये कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ शहरात शुक्रवारपासून बंदोबस्त लावण्यात येणार असून, आठ ठिकाणची नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे़ उमेदवारांकडून मतदारांना भूलविण्यासाठी केले जाणाऱ्या गैरप्रकारांवर पोलिसांची विशेष नजर असणार आहे़
महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार ८०० पोलिसांचा बंदोबस्त
By admin | Published: February 15, 2017 9:29 PM