इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा वाढत असलेला हिंसाचार लक्षात घेता केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) ५० अतिरिक्त कंपनी म्हणजे ५ हजारांहून अधिक जवान तैनात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. जिरिबाम जिल्ह्यात मालमत्तेची नासधूस करणारा जमाव व जवानांची चकमक सुरू असताना गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला. मणिपूरमधील विद्यमान स्थिती तसेच तेथे तैनात करण्यात आलेली सुरक्षा दले यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सलग दुसऱ्या दिवशी आढावा घेतला.
मणिपुरात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आदेश शाह यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच रविवारी दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या महिला व मुलांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलक बाबुपुरा येथे मालमत्तेची नासधूस करत असताना सुरक्षा दलाशी त्यांची चकमक झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. हा गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृताचे नाव के अथौबा असे असून, त्याचे वय २० वर्षांचे होते.
काँग्रेस आणि भाजपची कार्यालये व जिरिबामच्या अपक्ष आमदाराच्या घरांची रविवारी रात्री नासधूस करण्यात आली. जिरिबाम जिल्ह्यात १२ नोव्हेंबरला हिंसाचार घडल्यानंतर सीएपीएफच्या २०, सीआरपीएफच्या १५ व बीएसएफच्या ५ कंपन्या मणिपूरला रवाना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र वाढता हिंसाचार लक्षात घेता अतिरिक्त ५० कंपन्या तैनात करण्याचे ठरविले आहे.
जिरिबाममध्ये निदर्शकांनी सरकारी कार्यालयांना लावले कुलूप
जिरिबाममध्ये तीन महिला आणि तीन मुलांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ कोऑर्डीनेटिंग कमिटी ऑन मणिपूर इंटेग्रिटीच्या (कोकोमी) सदस्यांच्या नेतृत्वाखालील निदर्शकांनी संचारबंदीच्या आदेशांचे उल्लंघन करून सोमवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील अनेक सरकारी कार्यालयांचे दरवाजे बंद केले. मणिपूरमधील सात जिल्ह्यांमधील इंटरनेट बुधवारपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिरिबाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्यांच्या निषेधार्थ आंदोलक लम्फेलपत येथील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकुलात घुसले आणि त्यांनी तेथील मुख्य प्रवेशद्वार साखळ्या कुलूप लावून बंद केले. टाक्येल येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोरिसोर्सेस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यालयाच्या तसेच आणखी एका कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंदोलकांनी कुलूप लावले.
एन. बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याची एनपीपीची मागणी
मणिपूरमधील भाजपप्रणीत सरकारचा नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) रविवारी पाठिंबा काढून घेतल्यानंतर तसेच राज्यातील वाढत्या हिंंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी मंत्री व एनडीएचे आमदार यांची सोमवारी संध्याकाळी एक बैठक बोलाविली. एन. बीरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी एनपीपीने केली आहे.
महिला, मुलांच्या हत्येचा आरएसएसकडून निषेध
मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचाराचा रा. स्व. संघाने निषेध केला आहे. त्या राज्यातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पावले उचलावीत अशी मागणीही या संघटनेने केली आहे. रा. स्व. संघाने म्हटले आहे की, गेल्या १९ महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. निरपराध माणसांना त्यामुळे त्रास सोसावा लागत आहे.
एनआयएने दाखल केले तीन एफआयआर
जिरिबाम येथे सशस्त्र दहशतवाद्यांनी एका महिलेची हत्या केली. जाकुराधोर करेंग आणि बोरोबेकरा पोलिस स्टेशन येथे सीआरपीएफ चौकीवर झालेला हल्ला, बोरोबेकरा येथे दहशतवाद्यांनी जाळलेली घरे व नागरिकांच्या केलेल्या हत्या या प्रकरणांत एनआयएने एफआयआर दाखल केले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.