नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येत आहे. यामध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर दिसत आहे. मात्र त्याआधीच दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या कार्यालयासमोर बॅनरबाजी सुरू झाली आहे. निकाल पूर्णपणे येण्यापूर्वीच 'अच्छे होंगे 5 साल, दिल्ली में तो केजरीवाल' असं बॅनर लावण्यात आले आहे.
या बॅनरवरूनच दिल्लीत आपचे पुन्हा एकदा सरकार सत्तेवर येणार हे स्पष्ट झाले आहे. याआधी आलेल्या मतचाचण्यांमध्ये आम आदमी पक्षाला 56 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. तर भाजपला 14 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज होता.
2015 मध्ये जबरदस्त विजय मिळवून सत्तेत आलेले अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहे. 2015 मध्ये आपने 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र भाजपचा आक्रमक प्रचार आणि केंद्रीय मंत्र्यांनी लावलेली ताकत, यामुळे आपच्या जागा कमी होणार आहे. तरी आपच सत्ता स्थापन करणार हे चित्र सध्या तरी दिसत आहे.
दरम्यान राजधानी दिल्लीत काँग्रेसची पुन्हा एकदा पिछेहाट झाले आहे. अनेक राज्यांत सत्तेत असलेल्या काँग्रेसला दिल्लीत खातंही उघडता आले नाही. आपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अलका लांबा विजयी होतील, अशी शक्यता होती. मात्र त्या देखील पिछाडीवर असल्याचे समजते.