नवी दिल्ली: भारतीय लष्कराचे 50 जवान हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जवानांकडून लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे लष्करानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी सोमवीर नावाच्या जवानाला पोलीस आणि लष्करानं शुक्रवारी अटक केली. सोमवीरनं एका पाकिस्तानी तरुणीला सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील माहिती दिल्याचा संशय आहे. सोमवीर व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून एका तरुणीच्या संपर्कात होता. सोमवीर संबंधित महिलेसोबत फेसबुकवरुनही संपर्क साधायचा. अनिका चोप्रा या नावानं या महिलेचं फेसबुकवर अकाऊंट असल्याची माहिती समोर आली. हे अकाऊंट पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयकडून चालवलं जात असल्याचा संशय लष्कराला आहे. अनिका चोप्रांच्या फ्रेंडलिस्टमध्ये सोमवीरसोबत 50 भारतीय जवानांचा समावेश आहे. त्यामुळे या जवानांनादेखील हनी ट्रॅप करण्यात आलं असावं, असा संशय लष्कराला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. भारतीय लष्करासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली सोमवीरला शुक्रवारी जैसलमेरमधून अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ पाच हजार रुपये आणि अश्लील छायाचित्रांच्या बदल्यात या जवानानं देशाशी गद्दारी केल्याचं उघड झालं आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला हादरवणाऱ्या या हनिट्रॅपच्या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावरून झाली होती. हाय हॅलोच्या माध्यमातून जवान सोमवीर आणि पाकिस्तानी महिला एजंटमध्ये संवादाची सुरुवात झाली. या महिलेनं सोमवीरला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काही अश्लील छायाचित्रं पाठवली होती. त्याबदल्यात या जवानानं लष्कराशी संबंधित माहिती, टँक, हत्यारबंद वाहने, हत्यारे आणि लष्करी कंपन्यांच्या स्थितीबाबतची माहिती या महिलेला पुरवली. यानंतर या महिलेने त्याला पाच हजार रुपयेही दिले.
पाकिस्तानी महिला एजंटकडून 50 भारतीय जवान हनी ट्रॅप? चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:25 AM