देशभरात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये गेल्या ४८ तासांत भीषण गरमीमुळे मृत्यू झालेल्या देशाच्या विविध भागांतील ५० बेघर लोकांचे मृतदेह आढळून आले आले. हे सर्व मृत्यू उष्णतेमुळे झाले आहेत की अन्य काही कारणंही या मृत्यूला कारणीभूत आहेत का? य़ाबाबत अद्याप पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही.
दिल्ली एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी इंडिया गेटजवळील चिल्ड्रन पार्कमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्यात येईल.
९ दिवसांत १९२ जणांचा मृत्यू झाला
बेघर लोकांसाठी काम करणाऱ्या 'सेंटर फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट' या एनजीओने दावा केला आहे की, ११ ते १९ जून दरम्यान दिल्लीत अति उष्णतेमुळे १९२ बेघर लोकांचा मृत्यू झाला आहे. कडक उन्हाचा तडाखा कायम असताना उष्माघाताने जीव गमावणाऱ्यांची संख्या आणि रुग्णालयांमध्ये त्याचा त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
तीव्र जलसंकटाचा सामना करणाऱ्या दिल्लीत कमाल तापमान ४३.६ डिग्री सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा चार अंशांनी जास्त आहे. शहरातील किमान तापमान ३५.२ डिग्री सेल्सिअस होते, जे १९६९ नंतर जूनमधील उच्चांक आहे.
गेल्या दोन दिवसांत राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयात २२ रुग्णांना आणण्यात आले. रुग्णालयात पाच मृत्यू झाले असून १२ ते १३ रुग्ण लाइफ सपोर्टवर आहेत. रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, “या लोकांना इतर कोणताही आजार नव्हता. जेव्हा असे लोक रुग्णालयात येतात तेव्हा त्यांच्या शरीराचं तापमान नोंदवले जाते आणि ते १०५ डिग्री फॉरेनहाइटपेक्षा जास्त असल्याचं आढळून आल्यास आणि इतर कोणतेही कारण नसल्यास त्यांना उष्माघाताचे रुग्ण घोषित केले जाते.
उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांना उष्माघाताचे संशयित रुग्ण म्हणून घोषित केले जाते. दिल्ली सरकारची एक समिती आहे जी नंतर मृत्यूची पुष्टी करते. रुग्णालयाने ताबडतोब शरीर थंड करण्यासाठी 'हीटस्ट्रोक युनिट' स्थापित केलं आहे. अधिकारी म्हणाले, या युनिटमध्ये कूलिंग तंत्रज्ञान आहे आणि रुग्णांना बर्फ आणि पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये ठेवलं जातं. जेव्हा रुग्णाच्या शरीराचे तापमान १०२ डिग्री फॉरेनहाइटपेक्षा कमी होतं तेव्हा त्यांचे निरीक्षण केले जाते. त्यांची प्रकृती स्थिर असल्यास त्यांना वॉर्डमध्ये हलवले जाते. अन्यथा, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. दाखल झालेले बहुतांश रुग्ण हे मजूर आहेत.