हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: २२ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एनआयटी) अध्यक्षपदाच्या जागा रिक्त आहेत. तथापि, वैधानिक तरतुदीनुसार नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत एनआयटीचे संचालक अध्यक्षांची कामे पाहतात.
हे कमी म्हणून की काय २० इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्येही (आयआयआयटी) अध्यक्ष नाहीत. यामध्ये एक तर इतर तांत्रिक संस्थांच्या अध्यक्षांना अतिरिक्त जबाबदारी देऊन व्यवस्था सुनिश्चित करण्यात आलेली आहे किंवा कालावधी संपलेल्या अध्यक्षांचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे किंवा केंद्र सरकार / राज्य सरकारच्या ज्येष्ठांकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
याबरोबरच ७ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) सात अध्यक्षांच्या जागा रिक्त आहेत. या ठिकाणचा पदभार इतर आयआयटीच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.
आयआयटी, एनआयटी आणि आयआयआयटीची अध्यक्षपदे मानद आहेत. संस्थांना नियंत्रित करणाऱ्या संबंधित कायद्यांतर्गत या पदांना गैर-कार्यकारी भूमिका प्रदान केलेली आहे.
सरकार म्हणते निरंतर प्रक्रिया
- याबाबत सरकारचे म्हणणे आहे की, रिक्त पदे निर्माण होणे आणि योग्य व्यक्तींची नेमणूक करणे, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
- सध्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये ६,०२८ पदे रिक्त आहेत. आयआयटीमध्ये ४,५२६ व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (आयआयएम) ४९६ पदे रिक्त आहेत.
- शिक्षण मंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांना रिक्त जागा भरण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि आजवर ६,००० (प्राध्यापक / प्राध्यापकेतर) जागा भरण्यात आलेल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"